भंडारा: पालांदूर-अड्याळ राज्यमार्गावर पालांदूर गावालगत अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या एका इसमास धडक दिल्याने इसम जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.१५) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीतील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. मृताचे नाव रुपचंद माणिकराव नरुले (५०) रा. सोनेगाव/पेंढरी ता. लाखांदूर असे आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
रुपचंद हा १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजतादरम्यान रोजगारानिमित्त पालांदूर येथे आला होता. सायंकाळी ७.३० वाजता पालांदूर-अड्याळ राज्य मार्गावर पायी चालत असताना अज्ञात वाहनाने धडक देऊन फरपटत नेले. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला व मृतदेह चेंदामेंदा होऊन छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला. धडक दिलेले वाहन देखील घटनास्थळावरून निघून गेले.
अपघाताची माहिती मिळताच पालांदूर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी पाठविला. पालांदूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास ठाणेदार सतीश बन्सोड यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे करीत आहेत.