वाघाच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतमजूर वसंत गणपत मेश्राम (रा. बाम्पेवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला.  Pudhari
भंडारा

Bhandara Tiger Attack | मोहफुले वेचताना वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उमरझरी-बाम्पेवाडा परिसरात घटना

पुढारी वृत्तसेवा

Tiger Attack Victim Bhandara

भंडारा: साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उमरझरी-बाम्पेवाडा भागात गुरुवारी (दि. १९) सकाळी वाघाच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतमजूर वसंत गणपत मेश्राम (रा. बाम्पेवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मेश्राम हे नेहमीप्रमाणे शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात मोहाची फुले वेचण्यासाठी गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की, त्यांना बचावाची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटना वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) जंगल क्षेत्रात घडल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी  व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील पंचनामा व तपासाची कारवाई करण्यात आली.

मृत वसंत गणपत मेश्राम यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधार गमावल्याने मेश्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदत व परिसरात वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT