

Lakhandur Wife Harassment Case
भंडारा: पत्नीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देऊन घरी परतलेल्या पतीचा पत्नीशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या पतीने राहत्या घराच्या पोर्चमध्ये नायलॉन दोरीने गळफास लावून जीवन संपविल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.१८) रात्री ८ वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली. शुभम देवीदास चित्रीव (वय ३२, रा. जैतपूर) असे मृत पतीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्चरोजी पीडित महिला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या भाजीपाल्याच्या नर्सरीमध्ये काम करत होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महिला एकटी असल्याचे पाहून स्थानिक मुकेश रामदास उके (वय ३६) याने तिची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या पतीसह बुधवारी (दि.१८) दिघोरी/ मोठी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकेश उके याच्याविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांत तक्रार देऊन घरी परतल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला.
या वादातून पती शुभम चित्रीव याने टोकाचे पाऊल उचलत घराच्या पोर्चमध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना पत्नी, शेजारी आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच तातडीने दिघोरी मोठी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.