भंडारा: मोहाडी तालुक्यातील घोरपड येथील प्रियकर आणि प्रेयसीने विष प्राशन केले. यात प्रियकराचा मृत्यू झाला तर प्रेयसी गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दुधाळा या गावात घडली.
पुनीत नरेश भालावीर (२५) रा. घोरपड असे मृत तरुणाचे नाव आहे. पुनीतचे गावातीलच शेजारी राहत असलेल्या एका तरुणीवर प्रेम होते. तरुणीचे नुकतेच लग्न जुळले होते. तरुणाला माहित झाल्यावर तरुणाने तिला भेटण्याच्या प्रयत्न केला. तरुणी सध्या तिच्या मामाच्या घरून शिक्षण घेत होती. पुनीत तरुणीला भेटण्याकरिता मध्यरात्री गेला. त्यानंतर पुनीत आणि त्याच्या प्रेयसीने विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री पुनीतच्या घरी त्याने विष प्राशन केल्याचा फोन येताच पुनीतच्या घरच्यांनी हंबरडा फोडला. माहिती मिळताच घरच्या लोकांसह गावातील अनेक व्यक्ती घटनास्थळी पोहोचले. तेथे गेले असता त्या ठिकाणी पुनीतचे प्रेत आढळले. तर तरुणी सुद्धा बेशुद्ध अवस्थेत पडली होती. पुनितला दवाखान्यात हलवल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तरुणीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरलेली आहे. तरुणाच्या मृतपश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ आहे.