Bhandara Chandori Village Leopard Terror
भंडारा: गडेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत चांदोरी गावात रात्री धुमाकूळ घालीत दोन शेळ्या ठार मारणाºया बिबट्याने गावातील शौचालयात ठाण मांडले होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या चांदोरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र रहाटे आणि ग्रामस्थ मंगेश झोडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून जखमी केले.
या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. अखेर वनविभागाच्या रॅपीड रिस्पॉन्स टिमने घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या प्रयत्नाअंती शौचालयात दडून बसलेल्या बिबट्याला शिताफीने जेरबंद केले.
चांदोरी गावात रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. बिबट्याने सर्वप्रथम गुलाब हातझाडे यांच्या गोठ्यात प्रवेश करीत चार महिन्यांच्या शेळीच्या पिल्लाला झडप घालून त्याला जागीच ठार केले. या घटनेची माहिती गावात पसरत असतानाच, बिबट्याने शेजारीच असलेल्या रमेश हातझाडे यांच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला केला करून ठार मारले. सलग दोन ठिकाणी झालेल्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
रात्रभर धुमाकूळ घातल्यानंतर हा बिबट सकाळच्या सुमारास लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधत असताना मोरेश्वर हातझाडे यांच्या घराजवळील शौचालयात जाऊन बसला. सकाळी ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पहाटे ५ ते १० वाजेपर्यंत हा बिबट शौचालयात लपून बसला होता. दिवसाढवळ्या गावाच्या मध्यभागी बिबट अशाप्रकारे लपून बसल्याची बातमी पसरताच गावकºयांनी त्या ठिकाणी गर्दी केली. एका बाजूला भीती आणि दुसऱ्या बाजूला कुतूहल यामुळे नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
बिबट शौचालयात असल्याची कुणकुण लागल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने चांदोरीचे उपसरपंच जितेंद्र रहाटे आणि ग्रामस्थ मंगेश झोडे हे इतर नागरिकांसह घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, अचानक संतापलेल्या बिबट्याने या दोघांवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
घटनेची तीव्रता लक्षात घेता माजी जि.प. सदस्य माहेश्वरी नेवारी यांनी ताबडतोब वन विभागाच्या अधिकाºयांना या प्रकारची माहिती दिली. माहिती मिळताच साकोली वन विभागाचे अधिकारी, रेस्क्यू पथक आणि कर्मचारी व पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या मानवी वस्तीत आणि तेही एका बंदिस्त जागेत असल्याने त्याला बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे होते. वन विभागाच्या पथकाने अत्यंत सावधानी बाळगत आणि कौशल्याने मोकळ्या जागेची पाहणी केली. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि शर्थीच्या मोहिमेनंतर वन विभागाच्या चमूने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळवले.