Unregistered Heavy Vehicles in Bhandara
भंडारा: जिल्ह्यात दररोज विना नंबरचे शेकडो अवजड वाहने दिवस-रात्र धावत आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीला त्रास तर होत आहेच, परंतु अपघात झाल्यास जबाबदार कोण, परिवहन कार्यालय, महसूल विभाग, पोलिस प्रशासन याकडे लक्ष देणार का?, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वेळोवेळी परिवहन विभाग आणि पोलिस विभाग वाहनांची तपासणी करीत असते. तपासणीमध्ये वाहनधारकास कागदपत्रे नसणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दंड आकारला जातो. दुचाकीवरून जाताना अशा दंडात्मक कारवाईला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. परंतु, महामार्गावरुन अनेक विना नंबरची वाहने सर्रासपणे धावत असतात. अशा वाहनांमधून वृक्षतोड केलेली झाडे, रेती, मुरूम, दगड-गोटे, मॅग्नीज व कोळशाची वाहतूक होते. अशा वाहनांमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या गौण खनिजाची तपासणी होते, का असाही प्रश्न आहे.
भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची पासिंग व इतर कामे केली जातात. मात्र, अवजड वाहने विनाक्रमांकाची धावत असताना याकडे मात्र, परिवहन विभागाकडून जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे, परिवहन विभागाचे अधिकारी दररोज आपल्या वाहनाने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावरील वाहनांवर लक्ष ठेवून असतात. परंतु, त्यांना ही विना नंबरचे अवजड वाहने दिसत नसावीत का? हा प्रश्न आहे.
कायद्यानुसार कुठलेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनावर परिवहन विभागाकडून नंबर दिला जातो. तो नंबर वाहनाच्या नंबर प्लेटवर लिहूनच सदरील वाहन रस्त्यावर धावेल, असा शासनाचा नियम आहे. परंतु काही ठरावीक वाहनांवर मात्र शासनाचा हा नियम लागू होत नाही का? अशा वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात महसूल विभागाकडून काही वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. परंतु, यानंतर या विभागाचे अशा वाहनांकडे दुर्लक्ष होतच असते. एरव्ही दुचाकी चालकाकडे कागदपत्रे झेरॉक्स आहे का? दुचाकीवर समोरच्या बाजूला नंबर नसणे, इंडिकेटर तुटलेला असणे अशा छोट्या कायदेशीर बाबी पुढे करून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जातो. परंतु मोठ्या अवजड वाहनाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
शासन कितीही दावे करीत असले तरी रेती चोरी बंद झालेली नाही. दिवसाढवळ्या अवैध रेतीचे ट्रक विना नंबरचे धावत आहेत. महसूल विभाग व पोलिस प्रशासनाचा या चोरीचा व्यवसायामध्ये सहभाग असल्याचे यावरुन दिसून येते.-शिशुपाल पटले, माजी खासदार भंडारा