भंडारा : उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला ३ हजारांच्या लाचप्रकरणी मंगळवारी (दि.१५) रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचून केली. सुनील होमराज लोहारे (४५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
सुनील लोहारे हा श्रेणी तीनचा सहाय्यक महसूल अधिकारी आहे. तो नागपूर येथील गजानन नगरमधील रहिवासी आहे. तक्रारदाराच्या नावावर भंडारा तहसीलमधील केसलवाडा गावात एक शेती आहे. २०१७ मध्ये या शेतीचा काही भाग विकण्यात आला. या काळात चुकून तक्रारदाराच्या पत्नीचे नाव त्याच्या सातबारावरून काढून टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवण्यात आले. ही चूक दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने केसलवाडाच्या पटवारीकडे अर्ज केला होता. त्यानुसार हा अर्ज पुढील कारवाईसाठी भंडारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. दुसऱ्या व्यक्तीचे नाव काढून त्याच्या पत्नीचे नाव सातबारावर जोडण्यासाठी सुनील लोहारे यांने तीन हजाराची लाच मागितली. याबाबत अर्जदाराने ९ एप्रिल रोजी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ११ एप्रिल रोजी विभागाच्या पथकाने चौकशी केली. सुनील लोहारे लाच मागत असल्याची पुष्टी झाली. त्यानंतर आज (मंगळवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली. याबाबत भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहारे याच्या घराची झडती घेतली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिथुन चांदेवार, पोलीस हवालदार अतुल मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू वार्थी, पोलीस नाईक नरेंद्र लखाडे यांनी उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली केली.