भंडारा: पुढारी वृत्तसेवा: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१०) सादर केलेल्या अर्थसंकल्पात गोसेखुर्द सिंचन प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. यापूर्वीही या प्रकल्पाच्या कालमर्यादेबाबत अनेक घोषणा विधीमंडळात करण्यात आल्या. प्रत्यक्षात दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला नाही. आता पुन्हा या प्रकल्पाच्या पूर्णत्वास जून २०२६ ही ‘तारीख’ देण्यात आल्याने शेतकºयांना तोपर्यंत सिंचनाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (Gosikhurd Project)
राज्य अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील महत्वाचा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. या प्रकल्पाव्दारे डिसेंबर २०२४ अखेर १२ हजार ३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे सांगत या प्रकल्पासाठी सन २०२५-२६ करीता १ हजार ४६० कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Gosikhurd Project)
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसे येथे वैनगंगा नदीवर गोसे प्रकल्पाला १९८३ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू झाले. कधी निधीची वानवा तर कधी अन्य कारणांमुळे प्रकल्प रेंगाळत गेला. मागील १५ वर्षात या प्रकल्पाला गती मिळाली आणि काही शेतजमिनीला सिंचन सुरू झाले. महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने प्रत्येक अधिवेशनात या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची मुदत जाहिर केली जाते. जानेवारी २०२१ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसे धरणाला भेट देऊन तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वीही अनेक केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्र्यांनी धरणाला भेट देऊन प्रकल्प पूर्णत्वाबाबत मुदत जाहिर केली होती. आजच्या अर्थसंकल्पात ही मुदत जून २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.
गोसेखुर्द हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असला तरी पूर्ण क्षमतेने सिंचन होण्यास आणखी काही कामे करावी लागणार आहे. नागपूर,भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. याच प्रकल्पाचा आधार घेऊन वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यातून पश्चिम विदर्भातील शेतकºयांना सिंचनाची सोय होणार आहे. तथापि, गोसेखुर्द प्रकल्पाला आणखी जून २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आल्याने हा प्रकल्प आतातरी पूर्ण होणार का? असा प्रश्न पूर्व विदर्भातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
या प्रकल्पाच्या डावा आणि उजव्या अशा दोन कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. गोसे धरणाचे काम झाले असले तरी वितरिका, उपवितरिकांचे काम काही ठिकाणी शिल्लक आहेत. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही गावांचे पूनर्वसन होणे बाकी आहे. पूनर्वसनाबाबत अनेक बैठका झाल्या तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीला विलंब होत आहे.