पिंपळगाव, कान्हळगाव येथील महिला सरपंचांचा कारनामा समोर आला आहे.  File Photo
भंडारा

वय ४९, केले ७१ : योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच बनल्या म्हाताऱ्या

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. वृद्धासाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चक्क महिला सरपंच म्हाताऱ्या बनल्याचा प्रकार समोर आला आहे. सरपंचांनी शासनाच्या निराधार योजनेतील वृद्धापकाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार केले. तिथे चुकीची जन्मतारीख लिहून मागील सात - आठ वर्षांपासून त्या योजनेचा लाभ घेत आहेत. हा धक्कादायक प्रकार पिंपळगाव / कान्हळगाव येथील सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभणे यांनी केला आहे. (Bhandara Scam News)

रेखा यांनी सेतू केंद्रावरून बनावट आधार कार्ड तयार केला आहे. ३७५८ ५०१२ २७२७ या नंबरचे दोन आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत. एका कार्डवर १० नोव्हेंबर १९७५ तर दुसऱ्या आधार कार्डवर १ जानेवारी १९५३ अशा दोन जन्मतारखा मुद्रित आहेत. दुसरे आधार कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरण्यात आले आहे.

रेखा ज्ञानेश्वर गभणे ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या होत्या. त्यावेळी त्यांनी सरपंच पदासाठी ऑनलाइन नामनिर्देशन दाखल करताना शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर असलेली १० नोव्हेंबर १९७५ ही जन्मतारीख लिहिलेली आहे. रेखा यांचे माहेर भंडारा तालुक्यातील सिरसी येथील आहे. त्यांच्या शाळेच्या रिकार्डवर १० नोव्हेंबर १९७५ अशी जन्म तारीख आहे. (Bhandara Scam News)

मोहाडी तहसीलदारांच्या मार्फत वृद्धापकाळ योजनेत बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे जमा करण्यात आले. त्या पुराव्यात रेखा यांनी वय वाढवून दिलेले आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले आहे. त्यामुळे रेखा चे वृद्धापकाळ योजनेच्या मानधन आजही बँक खाता जमा होत आहे. मागील आठ वर्षांपासून त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होत आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत दीड लाखांची शासनाची फसवणूक करून अनुदान लाटल्याचे दिसून येत आहे. निवडणूक लढण्यासाठी टीसीच्या आधार घेतला गेला. वृद्धापकाळाचा लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर केला आहे. हे दोन्ही आधार कार्ड बघितले तर लक्षात येते. यावर आता कोणती कारवाई करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बोगस आधार कार्डच्या आधारे जन्मतारखेत बदल करून २२ वर्षे वय वाढवले. त्याच्या लाभ वृद्धापकाळ योजनेच्या लाभासाठी करण्यात आला. याची तक्रार जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे पिंपळगावचे उपसरपंच उमेश उपरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर, बिरजलाल गबने यांनी केली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या सरपंच महिलेवर फौजदारी कारवाई करावी तसेच त्यांचे सरपंच पद अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT