10000 Rupees Bribe Case
भंडारा: तडीपार असलेल्या आरोपीवर पुन्हा तडीपारीची कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी पवनी पोलिस ठाण्यात करण्यात आली.
अजित प्रल्हाद वाहने (३७) रा. पवनी असे आरोपी पोलिस नाईकचे नाव असून तो पवनी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहे. यातील तक्रारदार याच्या भावावर मुंबई पोलिस कायदा कलम ५६ अन्वये पवनी पोलिस ठाण्याकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या हद्दपारीची मुदत १३ जून रोजी संपणार होती. दिनांक १० जून रोजी पोलिस नायक अजित वाहने याने तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात बोलावून, तक्रारदार याच्या भावावर पुन्हा तडीपारीची कारवाई किंवा अन्य कोणतीही प्रतिबंधक कारवाई करायची नसेल तर त्याच्या स्वत:करिता १० हजार रुपये लाचेची मागणी केली. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यानंतर १३ जून आणि १४ जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
१७ जून रोजी पवनी पोलिस ठाण्यात शासकीय पंचांसह तक्रारदाराकडून लाच स्वीकृती कारवाईचे नियोजन केले असता पोलिस नायक अजित वाहने याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. याप्रकरणी अजित वाहने याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिस स्टेशन पवनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या घराची झडती सुरू आहे.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक नितेश देशमुख, उज्वला मडावी, उपनिरीक्षक संजय कुंजरकर, मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, प्रतीक उके, चेतन पोटे, मयूर सिंगणजूडे, विष्णू वरठी, हितेश हलमारे, हिरा लांडगे, सुमेध रामटेके, अभिलाषा गजभिये, राजकुमार लेंडे, पंकज सरोते यांनी केली.