Bhandara School Protest Pudhari
भंडारा

Bhandara ZP Protest | भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आवारातच विद्यार्थी, पालकांनी भरविली शाळा

राष्ट्रगीत, परिपाठही घेतला, चार तासाच्या आंदोलनानंतर मिळाले शिक्षक

पुढारी वृत्तसेवा

Bhandara School Protest

भंडारा: शाळा सुरू होऊनही एकही शिक्षक नसल्याने संतापलेले चिमुकले विद्यार्थी आणि त्यांचे पालक जिल्हा परिषदेत धडकले. शिक्षण विभागाच्या आवारातच त्यांनी शाळा भरविली. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत झाल्यानंतर परिपाठही घेण्यात आले. चार तास चाललेल्या या अजब आंदोलनानंतर शिक्षण विभागाने अखेरीस शाळेला एका शिक्षकाची नियुक्ती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत शाळांमध्ये परिवर्तन घडवण्याचा दावा सरकारकडून होत असला तरी तुमसर तालुक्यातील सोरणा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एकही शिक्षक नाही. परिणामी, शाळेतील ४४ विद्यार्थी सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेत पोहोचले. ‘आम्हाला शिक्षक द्या, नाहीतर आम्ही आमची शाळा इथेच चालवू’ अशी भूमिका घेत पालक आणि गावकºयांसोबत जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन सुरू केले.

२०२५ मध्ये, तुमसर तालुक्यातील सोरना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उत्कृष्ट व्यवस्थापन, शिस्त आणि गुणवत्तेच्या जोरावर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या मोहिमेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी शाळेची खूप प्रशंसा झाली होती. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. नवीन शैक्षणिक वर्षात, गावकऱ्यांनी निधी गोळा करून काही दिवसांसाठी शिकवण्यासाठी एका स्वयंसेवकाची व्यवस्था केली.

काही दिवसांसाठी लोहारा येथून एक शिक्षकही मुलांना शिकवण्यासाठी आले होते. मात्र, वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशानंतर ती व्यवस्थाही बंद झाली. शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. पालकांनी शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी करत शिक्षण विभागाला वारंवार निवेदने सादर केली आहेत, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. संतप्त पालक, विद्यार्थी आणि गावकºयांनी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांनी तिथेच परिपाठ सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे.

शिक्षण विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. शाळेत ४४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केल्यानंतर, प्रशासनाने आता एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे.
-धर्मपाल धुर्वे, सरपंच, सोरणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT