भंडारा : व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकण्याचा नादात एका १७ वर्षीय तरुणाने जीव गमावला. खणीत उडी मारून पोहत असलेल्या व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करणाऱ्या मित्राच्या डोळ्यादेखत युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुल्हाड शेतशिवारातील खाणीत घडली. तिर्थराज धनपाल बारसागडे (वय १७, रा. सोनेगाव/बुटी त. पवनी) असे मृत युवकाचे नाव आहे.
तिर्थराज याला रिल्स बनवून तो व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्याची आवड होती. रविवारी सायंकाळी तो चुल्हाड शिवारातील खाणीजवळ गेला. व मित्राला मोबाईल देऊन पाण्यात पोहत असलेला व्हिडिओ बनविण्यास सांगितले. त्यानंतर तिर्थराज याने खणीत उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मित्राला पोहता येत नसल्याने त्याने मोबाईलवरून गावातील तरूणांना व कुटुंबियांना याची माहिती दिली. व परिसरात आरडाओरडा केला. मात्र परिसरातील नागरिक येईपर्यंत तिर्थराज याचा मित्राच्या डोळ्यादेखत बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद अड्याळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.