

सातपूर (नाशिक) : शहरात पुन्हा एकदा निष्पाप बालकाचा बळी बांधकाम साइटवरील बेफिकीरपणामुळे गेला आहे. सातपूरमधील भोर टाउनशिपजवळ खेळत असलेल्या नऊवर्षीय मयूर संजय भोंडवे या चिमुकल्याचा पाय घसरून खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.2 ) घडली.
सदर खड्डा एका चालू गृहप्रकल्पासाठी खोदण्यात आलेला होता. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते, पण कोणतीही सुरक्षा भिंत, फीत, सूचनाफलक नव्हता. मयूर आणि त्याचे मित्र खेळत असताना हा अपघात घडला. प्रसंगावधान राखत आझाद शेख या युवकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय रुग्णालयात दाखलही केले, परंतु उपचारादरम्यान बुधवारी रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी, अमृतधाम विडी कामगारनगर परिसरात गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहताना तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. बिल्डर आणि मनपा प्रशासनाची बेपर्वाई या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत ४ निष्पाप मुलांचे जीव गेले आहेत. सदर बांधकाम साइटवर कोणतीही सुरक्षितता दिसून आली नाही. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही.
नाशिक : पंचवटीतील अमृतधाम लिंकरोडवरील पाटाजवळ असलेल्या द व्ही पार्क प्रकल्पाच्या उभारणीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून सोमवारी (दि.३०) तिघा शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संबंधित बिल्डर व ठेकेदाराबद्दल संतापाची लाट समोर आली होती. नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी रास्ता रोको केला होता. मात्र, पोलिसांनी निष्काळजीपणाचे कलम लावत, नातेवाईकांनी दाखल केलेल्या फिर्यादीतील अपहरणाचे कलम हटविले आहे.
साई हिलाल जाधव (१४), साई केदारनाथ उगले (१४), साई गोरख गरड (१५, तिघेही रा. विडी कामगारनगर) या एकाच गल्लीत शेजारी राहणाऱ्या चिमुरड्यांचा या घटनेत दुदैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, तिन्ही मुले बेपत्ता असल्याने, कुटुंबिय रविववारी दुपारपासून त्यांचा शोध घेत होते. रात्रभर पहिणे, गोदाघाट परिससरातत शोधकार्य सुरू होते. दरम्यान, मुलांचा शोध लागत नसल्याने, साई गरड यांचे काका राजेंद्र गरड यांनी आडगाव पोलिस ठाण्यात पुतण्याचे कोणीतरी फुस लावून अपहरण केल्याची अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तसेच उज्वला उगले यांनी देखील तक्रार केली होती. दरम्यान, २४ तासाच्या शोधानंतर सकाळी तिन्ही मुलांचे द व्हि पार्क येथील बांधकाम साईटवर खाेदलेल्या खड्यातील पाण्यात मृतदेह आढळून आल्याने, तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी अपहरणाचे कलम हटवित संशयित आरोपी बिल्डर विजय शेखलिया आणि आकाश शंकर गायकवाड यांच्यावर निष्काळजीपणाचा आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.१) दोन्ही संशयित आरोपींना पोलिस ठाण्यात तपासासाठी बोलाविण्यात आले होते.
सोमवारी (दि.३०) सकाळी ९ वाजता ही घटना समोर आल्यानंतर, संबंधित बिल्डर आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, यासाठी मृत मुलांच्या नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी रास्तारोको केला होता. नागरिकांचा रोष बघता, पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, अवघ्या चारच तासात हा गुन्हा मागे घेत, निष्काळजीपणाच कलम लावल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नातेवाईकांंचे जबाब घेतल्यानंतर अपहरणाचा गुन्हा हटवून निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली आहे.
संजय पिसे, पोलिस निरीक्षक, आडगाव पोलिस ठाणे