भंडारा : येथील जिल्हा महिला रुग्णालयातील २८.५ कोटी रुपयांच्या वैद्यकीय साहित्य खरेदी घोटाळ्याची चौकशी राजकीय दबावापोटी थंडबस्त्यात टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणताही अनुभव नसताना एका फर्निचर निर्मिती कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असून, या प्रकरणाचा चौकशी अहवाल तात्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय रेहपाडे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी अमरावती महिला रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटात तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते व्हेंटिलेटर्स वाशिम येथील एका किराणा दुकानाच्या नावाने नोंदणीकृत एजन्सीने पुरवले होते. तसाच धक्कादायक प्रकार भंडारा जिल्हा महिला रुग्णालयात घडला आहे. येथे वैद्यकीय साहित्य पुरवठ्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या 'प्रिया कुलर' या फर्निचर उत्पादक कंपनीला तब्बल २८.५ कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले."
विशेष म्हणजे, सुरुवातीला काढण्यात आलेल्या निविदेमध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता; मात्र ती प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवून या फर्निचर कंपनीला कंत्राट देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे २८.५ कोटींपैकी या कंपनीने केवळ ५ कोटी रुपयांचेच साहित्य रुग्णालयाला पुरवले आहे, असा दावा रेहपाडे यांनी केला.
या गैरव्यवहारावर शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जुलै महिन्यात आरोग्य विभागाचे सहसंचालक तडस यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. मात्र, इतके महिने उलटूनही चौकशी अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आलेला नाही.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) या चौकशीची माहिती मागितली असता, 'ही बाब जनहिताची नाही' असे हास्यास्पद कारण पुढे करत माहिती नाकारण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावामुळेच प्रशासन हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, हा चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, अशी मागणी रेहपाडे यांनी केली आहे.