भंडारा : शेतीचे काम आटोपून घरी परतलेल्या महिलेचा विद्युत प्रवाहित लोखंडी फ्रेमला स्पर्श झाल्याने विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी लाखनी तालुक्यातील मुरमाडी (सावरी) येथे घडली. इंदिरा घनश्याम बडवाईक असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, इंदिरा बडवाईक या नेहमीप्रमाणे शेतीचे काम करून सायंकाळी घरी परतल्या. घरातील लोखंडी फ्रेममध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. या फ्रेमला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विकास पडोळे यांनी धाडस दाखवत बचावाचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही धक्का बसला. गावकऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत इंदिराबाईं यांना ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मुरमाडी गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून विद्युत प्रवाहाचा स्रोत आणि नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे