भंडारा: विदर्भात जलपर्यटनाला मोठा वाव आहे. भंडारा येथे वैनगंगा नदीकाठावर होत असलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शनिवारी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, अधीक्षक अभियंता राजेश पाटील, भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.
कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून या कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली.
गोसेखुर्द जलाशय मौजा मौदी, (जिल्हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे पर्यटन विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पात नाविन्यपूर्ण जलपर्यटन केंद्र, बोटीसाठी आणि पर्यटकांसाठी रँप, पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, वाहनतळ, उपहारगृह, बगीचा, पर्यटकांसाठी विविध सुविधा, गावांना आणि इतर पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारण्यात येत असून एप्रिल २०२६ पर्यत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.