

ठाणे : आंदोलने करीत लोकांच्या मदतीला धावणारी शिवसेना कॉर्पोरेट करायला गेले ही काही लोकांकडून चूक झाली. ती आम्ही सुधारली असून ‘कम ऑनहेल्प मी’ अशी हाक आल्यास धावून जाणारे पहिले एकनाथ शिंदे असतात, असे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगून उद्धव ठाकरे यांच्यात हिमंत असेल तर कम ऑन किल मी या विधानाचा समाचार घेतला. कोणतीही दुर्घटना घडल्यास, एकनाथ शिंदे हे पहिले धावून जाणारे होते. आम्ही नेहमी वाचविण्याचाच विचार करतो, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन शिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला. त्यानंतर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादा विरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी 33 देशांत खासदारांच्या नेतृत्वाखाली सात शिष्टमंडळे पाठवली होती. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळाली होती. हा 14 दिवसांचा अनुभव ठाणेकरांसमक्ष मांडण्यासाठी ‘डिप्लोमसी बाय डॉ. श्रीकांत शिंदे’ या मुलाखतीचे आयोजन शुक्रवारी ठाण्यात करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापनदिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिमंत असेल तर कम ऑन किल मी’ या विधाननाला प्रतिउत्तर देत ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि राष्ट्रप्रमुख, उपराष्ट्रपती, मंत्री, सिनेट यांच्यासमक्ष भारताची भूमिका मांडण्याचा दुर्मिळ योग माझ्या आयुष्यात आल्याचे सांगत डॉ. शिंदे यांनी आपल्या राजकीय प्रवास उलघडा. ते म्हणाले मी महाविद्यालयात असताना खासदार झालो. माझ्यातील विद्यार्थी आज ही तसाच आहे. मला अभ्यास करायला आवडतो. मी आजही विविध बाबींचा अभ्यास करत असतो. त्यानुसार भेट देणार्या त्या देशांचा अभ्यास केला. राष्ट्रप्रमुखांसोबत बसून देशाची बाजू मांडली. लायबेरिया येथील राष्ट्रप्रमुखांनी मला सिनेटमध्ये बोलण्याची संधी दिली. अशी संधी मिळणे हे खूप अभिमानास्पद आहे असेही त्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगामध्ये जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली. पाकिस्तानचा बुरखा आम्हाला फाडायचा होता. ही संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली असेही शिंदे म्हणाले.
पाकिस्तनाच्या सोशल मिडियाच्या युद्धात भारतात असुरक्षित वाटणार्या भारतीयांनी भर टाकल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तान प्रेमावर टीका करताना ओसामाबिन लादेन याने अमेरिकेत केलेला हल्ला ते विसरलेले दिसतात, त्यांनी अतिरेकी हल्ल्याबाबत उजळणी करायला हवी आणि त्यानंतर पाकिस्तान प्रेम दाखवायला हवे. एकट्या माणसामुळे भारत - अमेरिका जुन्या मैत्रीवर परिणाम होणार नाही.
भारताची 33 देशात भूमिका मांडण्यात आली असताना आम्ही केलेल्या मुस्लिम देशांमध्ये धार्मिक दहशतवादाला विरोध करण्यात आला. त्या विरोधात निषेध ठरावही मांडण्यात आले. मुस्लिम राष्ट्राला खरी वस्तुस्थिती माहिती नसते त्यामुळे गैरसमज असल्याचेही त्यांच्या बोलण्यात समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
मी भारताचे प्रतिनिधित्व करताना कशी भूमिका मांडतो याचे दडपण वडील एकनाथ शिंदे यांच्यावर आले होते, अशी कबुली देत दौर्यावरून परतल्यावर त्यांनी घट्ट मिठी मारली आणि भरून आल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे हे मला नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. पण ते स्वतः थेट माझ्या चुका सांगत नाही तर मित्रामार्फत मला त्या सांगत असतात, त्या दुरुस्त करायला सांगतात. त्यांनी तशी पद्धत विकसित केल्याचे सांगताच सभागृहात एकच हसा पिकला. दौर्यावरून परतल्यानंतर आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटलो आणि सर्व अहवाल कथन केले. त्यावेळी जगातील देशामध्ये अशाप्रकारे पार्लमेंट फर्मद्वारे संवाद वाढविला पाहिजे तसेच भारताच्या प्रगतीच्या बातम्या ह्या जगातील विविध देशात पाठवायला हव्यात अशी सूचना केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.