Cattle Herder Killed Tiger Attack Tumsar
भंडारा: तुमसर तालुक्यातील आगरी गावालगतच्या दावेझरी चुलरडोह-आगरी जंगल परिसरात गुरुवारी (दि.६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार झाल्याची घटना घडली. बंसीलाल मेश्राम (वय ५५, रा. दावेझरी) असे मृताचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे जंगल लगतच्या परिसरातील गावांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंसीलाल मेश्राम हे आपल्या पत्नीसोबत जनावरे चारण्यासाठी चुलरडोह-आगरीच्या जंगलात गेले होते. जनावरे चारत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बंसीलाल यांच्यावर जीवघेणी झडप घातली. पत्नीच्या डोळ्यासमोरच वाघाने त्यांना जबड्यात पकडून जंगल व डोंगराच्या दिशेने फरफटत नेले. पत्नीने प्रचंड आरडाओरडा केल्याने गावकºयांना तातडीने माहिती मिळाली, परंतु तोपर्यंत वाघ त्यांना घेऊन घनदाट जंगलात निघून गेला होता.
ग्रामस्थांची शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावांतील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. हातात काठ्या, कुºहाडी आणि दांडके घेऊन ग्रामस्थांनी वाघ ज्या दिशेने गेला त्या बाजूने शोधमोहीम सुरू केली. आगरी-नागझिरा खोल भागात शोध घेतला असता, बंसीलाल मेश्राम यांचा अस्ताव्यस्त अवस्थेत मृतदेह आढळून आला. या अंगावर काटा आणणाºया घटनेमुळे दावेझरी गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थलावर दाखल झाले.
वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन
या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विनाकारण जंगलात जाणे टाळावे, एकट्याने जनावरे चारण्यासाठी जाऊ नये, तसेच पहाटे आणि संध्याकाळी जंगल परिसरात फिरणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.