Bhandara Tipper accident woman death
भंडारा: पोलिस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या सितेपार येथे टिप्परच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१३) सकाळी १०:३० च्या सुमारास घडली. अपघातग्रस्त टिप्पर सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतला असून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास फंदु कटनकार (वय ३४, रा. चुल्हाड, ता. तुमसर) हा आपली आई निलाबाई कटनकार (वय ७०) यांना दुचाकी (एमएच. ३६/ ए.क्यू. ७९८३) वरून मुंढरी या गावी घेऊन जात असताना सितेपार गावालगत सितेपारकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर (एमएच. ४० / बी.जी. ०१८०) च्या चालकाने मोटारसायकलला कट मारली. यात विलास आपल्या आईसोबत खाली पडला. यात निलाबाईचा टिप्परच्या मागील चाकाखाली डोके आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा विलास कटनकार हा किरकोळ जखमी झाला.
या घटनेचे वृत्त कळताच सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन यांनी घटनास्थळ गाठले व अपघातातील टिप्पर ताब्यात घेतले. सदर टिप्पर हा गोंदेखारी येथील रमेश बनकर यांचे मालकीचा असून चालकाचे नाव धर्मेंद्र राऊत (रा. गर्रा बघेडा ता. तुमसर) असे आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन पटले करीत आहेत.