Cannabis Smuggling Bhandara AI Photo
भंडारा

Bhandara Ganja Seized | सेंदूरवाफा टोलनाक्यावर २४५ किलो गांजा जप्त; चालक व क्लीनर ताब्यात

मुंबई नार्कोटिक्स व साकोली पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Cannabis Smuggling Bhandara

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील सेंदूरवाफा टोलनाका येथे मुंबईच्या अमली पदार्थ (नार्कोटिक्स) विरोधी पथक आणि साकोली पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या धाडसी कारवाईत तब्बल २४५ किलो गांजा जप्त करण्यात आला. ओडिशातून नागपूरकडे तस्करीसाठी नेण्यात येत असलेला हा मोठा अमली पदार्थांचा साठा आयशर ट्रकमधून जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी चालक व क्लीनर अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांच्या मोठ्या रॅकेटला जबर धक्का बसल्याची चर्चा आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला गोपनीय सूत्रांकडून ओडिशातील संबलपूर येथून नागपूरकडे आयशर वाहन क्रमांक MH-40-CD-4548 मधून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी सतीश ठाणेदार  महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने साकोली पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्गावरील सेंदूरवाफा टोलनाक्यावर सापळा रचला.

मंगळवार, ३० जून रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता संशयित आयशर ट्रक टोलनाक्यावर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमधील कॅरेटच्या खाली अत्यंत चतुराईने लपवून ठेवलेला २४५ किलो गांजा आढळून आला. त्यानंतर संपूर्ण अमली पदार्थांचा साठा तात्काळ जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ट्रक चालक कमलेश किरणसिंग बघेल (वय ४२, रा. रामेश्वरी, नागपूर) तसेच क्लीनर प्रशांत श्रावण धुर्वे (वय २२, रा. हातुरणा, ता. वरुड, जि. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी, आयशर वाहन आणि जप्त करण्यात आलेला गांजा नार्कोटिक्स विभागाने आपल्या ताब्यात घेतला असून, या अमली पदार्थ तस्करीमागील मुख्य सूत्रधार, पुरवठा साखळी आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

गोपनीय माहितीच्या अचूक विश्लेषणासह नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईमुळे राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीला जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे. या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT