Sakoli Shepherd Killed by Bear
भंडारा: साकोली वनपरीक्षेत्रातील सानगडी (पूर्व) उपवन क्षेत्रातील पापडा-१ बिट येथे गुरे चराईसाठी गेलेल्या गुरख्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये दाखल असलेले सोनका (पळसगाव) येथील रहिवासी दौलत मणिराम राऊत (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
१९ जानेवारी रोजी दौलत राऊत हे दोन सोबत्यांसह जंगलात गेले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास जवळच लपून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला चढविला. काही अंतरावर उभ्या असलेल्या साथीदारांनी धाव घेऊन हस्तक्षेप केल्यावर अस्वल जंगलात निघून गेले. हल्ल्यानंतर जखमी दौलत राऊत यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये हलविण्यात आले; मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रात्री सुमारे ९.३० वाजता त्यांचे निधन झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक गुरबेले, खंडागळे, वनरक्षक आशिष तूरकर, एस. एन. मेश्राम, गजभिये घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्राधिकारी सचिन कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकासह पंचनामा करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुढील धोके टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, साकोली वनपरीक्षेत्र कार्यालयाकडून गावोगावी जनजागृती करण्यात येत असतानाही अनेक नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करून जंगलात प्रवेश करीत असल्याचे चित्र आहे. वन्यजीवांच्या हालचालींबाबत सतर्क राहणे व दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे वनविभागाने पुन्हा अधोरेखित केले आहे.