भंडारा : सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना साकोली तालुक्यातील गोंडउमरी नजीकच्या निलज येथे १९ वर्षीय तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले आणायला जाणे त्याच्या जीवावर बेतले. ही दुर्देवी घटना मंगळवारी (दि.२१) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिक सुखदेव शेंडे असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रतिक हा दिवाळीच्या पूजेकरिता कमळाचे फूल आणण्यासाठी काही मित्रांसह तलावात गेला होता. कमळाचे फुल तोडण्यासाठी प्रतिक तलावात उतरला. तो तलावाच्या मध्यभागी पोहोचला. मात्र, पोहता येत नसल्याने तो माघारी परतला. तलावाकाठी पोहोचल्यावर तो खूप दमला. मित्रांनी काठावरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिक पाण्याबाहेर येवू शकला नाही. वेलीमध्ये अडकल्याने प्रयत्न करूनही त्याला बाहेर पडता आले नाही.