Bhandara News : १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर पती-पत्नीचे मृतदेह सापडले, पाय धुताना पडले होते गोसखुर्द कालव्यात! 
भंडारा

Bhandara News : १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर पती-पत्नीचे मृतदेह सापडले, पाय धुताना पडले होते गोसखुर्द कालव्यात!

एकाच वेळी अंत्यसंस्कार, सुरक्षा कठडे नसल्याने घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: पवनी तालुक्यातील कोरंभी येथे गोसेखुर्दच्या कालव्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. घटनेच्या १८ तास चाललेल्या शोधमोहिमेनंतर सोमवारी दोघांचेही मृतदेह आढळून आले. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कालव्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल अशोक बनकर (वय २९) आणि त्यांची पत्नी प्रज्ञा (वय २६) हे रविवारी, ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास कोरंभी येथील कालव्याजवळ दुर्घटनेचे बळी ठरले. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि शोधकार्यात मदत करणाºया पथकांच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू केली. रविवारी रात्री सुमारे ७.३० वाजता प्रज्ञा यांचा मृतदेह आढळून आला. मात्र, स्वप्निल यांचा शोध लागला नव्हता. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर दुपारी सुमारे १२ वाजता स्वप्निल यांचाही मृतदेह शोधण्यात यश आले.

कालव्यात चार मीटरपेक्षा अधिक पाणी आणि रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पवनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी ६ वाजता कोरंभी येथील स्मशानभूमीत पती-पत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्घटनेनंतर महादेव देवस्थान मार्गावरील कालव्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कालव्यावर सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कालव्याच्या काठावर सुरक्षा कठडे उभारावेत, तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT