

भंडारा - नागपूरहून गावी आलेले पती-पत्नी शेत पाहण्याकरिता गेले असता पाय चिखलाने भरल्याने गोसेखुर्दच्या उजवा कालव्यात धुण्यासाठी उतरले असता पत्नीचा पाय घसरून कालव्यात पडली. तिला वाचविण्यासाठी पाठोपाठ पतीने उडी घेतली. यात दोघांचाही अंत झाल्याची घटना आज घडली.
उन्हाळ्यातच लग्न बंधनात बांधले गेलेल्या या दाम्पत्याचा अंत झाल्याने अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी असे म्हणण्याची वेळ आली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार, रविवारी कोरंबी येथील स्वप्नील अशोक बनकर(२९) व पत्नी प्रज्ञा बनकर(२५) हे कामासाठी नागपूर येथे राहत होते.
काही कामाच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी ही दाम्पत्य पवनी तालुक्यातील कोरंबी येथे स्वगावी आले होते. वडिलोपार्जित शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल लागल्याने दोघेही गोसेखुर्द उजव्या कालव्यात पाय धुण्यासाठी उतरले असता पाय घसरून पडले. यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
कालव्यात 4 मीटरच्या वर पाणी असून खळखळणारा प्रवाह असल्याने ही दोघेही वाहून गेले. दरम्यान दोघांचेही प्रेत वाहून जातांना बघ्यांना दिसल्याने मृत्यू पावल्याचे सांगण्यात येत असून प्रेतांचे शोध कार्य सुरू आहे.
सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमन सुन्न करणारी आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रेतांचा शोध घेणे सुरू आहे. कालव्यात पाण्याची मात्रा जास्त व अंधार असल्याने शोध कार्यात अडथळे येत असले तरी पोलीस प्रशासन शोधकार्यात विशेष लक्ष देऊन युद्ध स्तरावर कार्य सुरु आहे.