Nagpur Raipur Highway Police Constable Death
भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भंडारा शहरालगतच्या नवीन बायपासवर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात वाहतूक शाखेतील चालक हवालदाराचा मृत्यू झाला. सालेबर्डी येथे पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनला अज्ञात आयशरने धडक दिली. यात हवालदार चालक किशोर रमेश हटवार (वय ४१) यांचा मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला. धडकेनंतर आयशरचालक वाहनासह पसार झाला.
पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास सालेबर्डी येथील नवीन बायपासवर ही घटना घडली. भंडारा येथील पोलिस वाहतूक निरीक्षक कक्षाचे हवालदार चालक किशोर हटवार हे एमएच १२ डब्ल्यूझेड ४८०८ क्रमांकाच्या पोलिस व्हॅनने सहायक फौजदार आणि शिपायासह गस्तीवर होते.
दरम्यान, रस्त्यावर उभा असलेला ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगण्यासाठी पोलिस व्हॅन थांबली होती. त्याचवेळी मागून आलेल्या अज्ञात आयशरने पोलिस व्हॅनसह साकोलीच्या दिशेने जाणाºया ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात किशोर हटवार आणि ट्रॅक्टरचालक पवन युवराज कापगते (३५, रा. उमरी, ता. साकोली) गंभीर जखमी झाले. हटवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना हवालदाराला प्राण गमवावे लागल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर आयशरचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे ही घटना हिट अँड रनची ठरली असून, पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.