

Bhandara Bike Falls Into Drain
भंडारा: लाखांदूर तालुक्यातील बारव्हा-तई मार्गावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या नाल्यात कोसळले. दुचाकी अंगावर पडल्याने पाण्यात अडकलेल्या २७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली. स्वप्नील हरिदास पिलारे (रा. जैतपूर, ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील पिलारे हा मित्रासोबत दुचाकीने (क्र. एमएच ३४ सीएल ००९४) बारव्हा-तई मार्गाने जात होता. प्रवासादरम्यान अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली उतरून बाजूच्या नाल्यात कोसळली. यावेळी दुचाकी स्वप्नीलच्या अंगावर पडली. नाल्यात साचलेल्या पाण्यात तो अडकल्याने बाहेर पडू शकला नाही. पाण्यात बुडून आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच दिघोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी दिघोरी (मोठी) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मडावी करीत आहेत.
अवघ्या २७ व्या वर्षी स्वप्नीलचा अकाली मृत्यू झाल्याने पिलारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कामानिमित्त बाहेर पडलेला तरुण घरी परतण्याऐवजी मृतावस्थेत आढळल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.