Bhandara Murder News
भंडारा : संपत्तीच्या वादातून सासऱ्याची हत्या करून मृतदेह पुलाखालील सिमेंटच्या पायलीमध्ये लपवून नंतर पसार झालेल्या जावयाला त्याच्या मित्रासह पोलिसांनी अटक केली. ११ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. कारधा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर आरोपींना संयुक्तपणे अटक केली.
आरोपीमध्ये जावई अमित रमेश लांजेवार (वय ३५, रा. शुक्रवारी शिवाजी वॉर्ड भंडारा) आणि त्याचा मित्र योगेश उर्फ गप्पू फणिंद्र पाठक यांचा समावेश आहे. आरोपींनी किशोर धर्मा कंगाले (वय ६५) यांची हत्या केली होती.
किशोर कंगाले ९ जानेवारी रोजी अचानक बेपत्ता झाले. त्यांचा पुतण्या मंगेश दुलीचंद कंगाले यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी तपास सुरू केला. जावई अमित आणि त्याच्या मित्राने किशोर यांच्यावर हल्ला केला, तेव्हा किशोरने त्यांच्या मित्राला फोन करून याबद्दल माहिती दिली. तेव्हापासून पोलिस तपासात गुंतले होते. दरम्यान, रविवारी ११ जानेवारी रोजी कोकणगड दरम्यानच्या पुलाखाली किशोर कंगालेंचा मृतदेह आढळला. कारधा पोलिस आणि एलसीबी पथक संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत होते.
पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन बंद ठेवले होते. पोलिस पथकाने नागपूर, रामटेक येथेही आरोपींचा शोध घेतला. परंतु आरोपी सापडले नाहीत. तेव्हा पथकाने गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमितचा ठावठिकाणा सापडला. त्याला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक आणि भंडाराचे प्रभारी पोलिस उपविभागीय अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर, कारधा पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव, विवेक सोनवणे, केशव पुंजरवार, पोलिस उपनिरीक्षक पाटील, सोनपिंपळे आदींनी ही कारवाई केली.