भंडारा : एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांचे लाखो रुपये लुटणाऱ्या हरियाणा राज्यातील टोळीच्या म्होरक्याला लाखनी पोलिसांनी नागपूरातून अटक केली. अझरउद्दीन ताहीर हुसैन (रा. टॉका, हातीन, पलवल, हरियाणा) असे त्याचे नाव आहे. लाखनी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध बँकांचे तब्बल ६१ एटीएम कॉर्ड जप्त केले.
३ जुलै रोजी लाखनी येथील एटीएममध्ये नरेश भाजीपाले यांच्या २५ हजार ७०० रुपयांच्या फसवणुकीनंतर लाखनी पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. लाखनी घटनेतील तपासात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच दिवशी तिरोडा येथे अशीच घटना घडल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी वाहनाचा फास्ट टॅग तपासून नागपूरमधून एकाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली.
नागपूरहून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याजवळून विविध बँकांचे एटीएम कार्डसह चारचाकी वाहन आणि २६ हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली. हे प्रकरण महाराष्ट्रात आंतरराज्यीय स्तरावर एटीएम कार्ड फसवणुकीविरोधातील महत्त्वाचे पाऊल असून आरोपींनी ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य लोकांना टार्गेट करून आर्थिक हानी पोहोचवली आहे. या टोळीच्या अन्य सदस्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात पोलिस आहेत.
अझरउद्दीन हुसैन याच्यावर नागपूर ग्रामीण, गोंदिया व नागपूर शहर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत पूर्वी ४ गुन्हे दाखल आहेत. लाखनीचे पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ व उपनिरीक्षक सुदाम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदाम कांबळे, पोलिस हवालदार अमितेश वडेटवार, निलेश रामटेके, वासंती बोरकर, पोलिस शिपाई ओमप्रकाश सार्वे, सचिन बुधे, स्वप्नील कहालकर, प्रशांत धकाते, पीयूषकुमार बाच्छल, हवालदार लोकेश ढोक, आशिक निंबार्ते या अंमलदारांनी सहभाग घेत अत्यंत तपास पूर्ण केला आहे.