जल्‍लोष करताना सहकार पॅनेलचे संचालक मंडळ  Pudhari Photo
भंडारा

Bhandara District Bank | भंडारा जिल्हा बँकेवर महायुतीप्रणित सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला मोठा धक्का

न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेल्या सहा जागांचे निकाल गुरुवारी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीप्रणित सहकार पॅनलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, उर्वरित सहा जागांवरही सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे या पॅनलची संचालक संख्या आता १७ वर पोहोचली असून, काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे जिल्हा बँकेवर महायुतीचे एकहाती नियंत्रण प्रस्थापित झाले आहे.

विजयी झालेल्या सहा संचालकांमध्ये नाना पंचबुद्धे, आशा गायधने, तिरा तुमसरे, धर्मराज भलावी, योगेश हेडाऊ आणि चेतक डोंगरे यांचा समावेश आहे. यापूर्वी पंधरा जागांचे निकाल जाहीर झाले होते, तर न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेल्या सहा जागांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलचा मोठा पराभव झाला असून, खुद्द खासदार प्रशांत पडोळे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महायुतीच्या सहकार पॅनलने १७ जागांवर विजय मिळवल्याने, विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती निश्चित झाली आहे. या यशामागे महायुतीचे नेते प्रफुल पटेल, परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या विजयामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेनंतर भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसला या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून, अंतर्गत मतभेद आणि उमेदवार निवडीतील गोंधळ हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. सहकार क्षेत्रातील या पराभवाच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT