अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू  Pudhari
भंडारा

Bhandara Accident | धारगाव येथे ‘हिट अँड रन’चा थरार: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वृद्ध ठार

वाहन भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Dhargaon Hit And Run


भंडारा:
नियती कधी, कुठे आणि कसा घाला घालेल याचा काहीच नेम नसतो. ज्यांनी आपली आयुष्यभराची धावपळ थांबवून निवृत्तीनंतरचा काळ शांततेत जगण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच वृद्धत्वाच्या वळणावर मृत्यूने या दोन मित्रांना गाठले. धारगाव येथील रहिवासी असलेले भिवाजी पंढरी बोदेले ( वय ७२) आणि कुंडलिक अमृत वालदे (वय ६३) अशी मृतांची नावे आहेत.

भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाणे हद्दीतील धारगाव येथे शनिवारी पहाटे झालेल्या एका भीषण ‘हिट अँड रन’ अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेले हे दोघेही पुन्हा आपल्या घरी परतलेच नाहीत, या घटनेने संपूर्ण धारगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे दोघेही अत्यंत मनमिळाऊ म्हणून ओळखले जात होते. आरोग्याबद्दलची जागरूकता म्हणून ते दोघेही नित्यनेमाने दररोज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडत असत. आजची सकाळही त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. पहाटेच्या सुमारास गप्पागोष्टी करत ते घराबाहेर पडले. ५.३० वाजेच्या सुमारास धारगाव येथील कोकणागड पहाडी परिसराकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडताना कोकणागड फाट्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने या दोघांनाही जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, भिवाजी बोदेले आणि कुंडलिक वालदे या दोघेही जागीच गतप्राण झाले. धडक दिल्यानंतर वाहनचालकाने थांबण्याचे सौजन्यही दाखवले नाही किंवा मदतीचा हात दिला नाही; उलट, वाहन भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिस तपासाला वेग

अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या घटनेमुळे धारगावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महामार्ग बनला  ‘डेथ ट्रॅप’

धारगाव येथील ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो भाग राष्ट्रीय महामार्गावर आहे. या भागात यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. महामार्गावर असलेल्या या वळणामुळे किंवा परिसरातील गतिरोधकांच्या अभावामुळे येथे अनेकदा वाहने अतिवेगात असतात. या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी कारधा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT