

भंडारा: शहरातील खांबतलाव येथील धार्मिक स्थळांजवळच एका बियर बारला परवानगी मिळाली आहे. या बारसमोरच रामद्वारा साधू समाधी देवस्थान असून मद्यपी त्याठिकाणी लघुशंका करतात. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात असून या बियर बारची परवानगी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
खांबतलाव चौकात अलीकडेच जी.बी. रेस्टारेंट अॅन्ड बियर बार सुरू झाले आहे. या बारच्या लगत प्रसिद्ध बहिरंगेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, राम मंदिर, रामायण पार्क, रामद्वारा साधु समाधी देवस्थान आहे. या देवस्थानांमध्ये दररोज भावीक येत असतात. येथूनच श्री राम शोभायात्रा दरवर्षी निघत असते. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. दरवर्षी शहरातील कान्होबा, गणपती विसर्जन याचठिकाणी होत असतात. हे सर्व देवस्थाने जी.बी. बिअर बारपासून काही अंतरावर आहेत.
परंतु, रामव्दारा समाधी विश्वस्त मंडळ हे धार्मिक स्थळाचे प्रवेशव्दार व धार्मिक स्थळ जी.बी. बिअर बारपासून फक्त १० ते १२ मिटर अंतरावरच आहे. रामद्वारा समाधी विश्वस्त मंडळाचे व बाच्छील कुटुंबाचे या जागेवरून वाद न्यायालयात सुरु आहे. त्यावर बळजबरीने जी.बी. बिअर बारचे मालक गुड्डु ऊर्फ ललीत नंदलाल बैस याने समाधीस्थळाची सुरक्षा भिंत तोडून बारसाठी पार्कींग केलेली आहे. येथे येणारे मद्यपी आपली वाहने त्याठिकाणी लावतात. त्याचठिकाणी लघुशंका करतात. त्यामुळे या धार्मिक स्थळाचे रुपांतर मुत्रीघरात झाले आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून तातडीने या बारचा परवाना रद्द करावा, नियमांची पायमल्ली करुन बारला परवानगी देणाºया अधिकाºयांची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर श्री बहिरंगेश्वर मंदिर, श्री राम मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिरांचे अध्यक्ष, स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जागेच्या वादातून गेला जीव
समाधीस्थळावरील बळजबरीने पार्किंगच्या वादातून जी. बी. बिअर बारचा मालक गुड्डू ऊर्फ ललीत बैस याने रमनसिंह बाच्छील यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रमनसिंह बाच्छील यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुड्डू ऊर्फ ललीत बैस याच्याविरूध्द भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार धार्मिक स्थळापासून ७५ मिटरच्या आत बिअर बारचा परवाना देता येत नाही. तरीसुद्धा नियमांची पायमल्ली करून येथे बिअर बारचा परवाना करता देण्यात आला.