Bhandara Crime News
भंडारा : लग्नाची घटीका आटोपून मुलीच्या विदाईचा कार्यक्रम येऊन ठेपला असताना वधुपित्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.२९) दुपारी २.३० वाजता तुमसर तालुक्यातील झारली गावात घडली. लग्नमंडपातच मुलीच्या बापाचा मृत्यू झाल्याने सर्वांच्या कुंटुंबियांच्या आनंदावर विरजन पडले. गणेश मयराम खरवडे (वय ५४) असे मृत वधुपित्याचे नाव आहे.
झारली येथील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी गणेश मयराम खरवडे यांच्या मुलीचा पल्लवी हिचा भंडारा शहरातील युवकासोबत आज (मंगळवारी) विवाह होता. दुपारी १२ वाजता बापाने मुलीचे कन्यादान करत विवाह सोपास्कार पार पाडले. पाहुण्याची वर्दळ सुरू होती. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. त्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू झाली. काही वेळात मुलीच्या विदाईचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने ते रस्त्यावर कोसळले. मित्र व नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी २.३० च्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच लग्नघरात दु:खाचा डोंगर कोसळला. सासरी जाण्यापुर्वीच बापाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ मुलीवर आली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.