भंडारा: पुढारी वृत्तसेवा : पवनीच्या ग्रामीण रुग्णालयातून उपचार घेऊन पती-पत्नी दुचाकीने गावी परत जात असताना वैनगंगा नदीच्या पुलावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला असून त्यांना भंडारा येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले. ही घटना आज (दि.८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
दर्शना शिवशंकर चवरे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून शिवशंकर रामदास चवरे (वय ३८) असे जखमी पतीचे नाव आहे. दोघेही पती-पत्नी हे पवनी तालुक्यातील इटगाव येथील रहिवासी असून दुचाकीने पवनी येथे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आले होते. दर्शना यांच्यावर नुकतीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती. पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात त्या पतीसह आल्या होत्या. उपचार करुन परत जात असताना वैनगंगा नदीच्या पुलावर धानाची पोती भरलेल्या ट्रक (एमएच ३४ एबी १३४४० ने दुचाकीला मागेहून धडक दिल्याने दर्शना यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवशंकर चवरे हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे. ट्रकचालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास पवनी पोलिस करीत आहेत.