Bhandara Pradeep Padole resigns
भंडारा: नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अनपेक्षित धक्का बसला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा तुमसर/ मोहाडी विधानसभा प्रमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती स्वत: प्रदीप पडोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन १९९५ पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तर सन २००८ पासून पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता व संघटना वाढीसाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. पक्षात असताना पक्षाने देखील त्यांचा कार्याचा सन्मान करून त्यांना तुमसर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद दिले. त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढविली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकिर्द सांभाळली आहे.
प्रदीप पडोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी झटून काम केले, पक्षवाढीला हातभार लावला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत मतभेद, निर्णय प्रक्रियेत स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि सन्मानाच्या प्रश्नावरून पडोळे अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी ‘मन भारी आहे, पण स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घ्यावाच लागला, मात्र मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता राहीन’, अशा भावना व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही पडोळे यांच्या समर्थनार्थ चर्चा रंगल्या आहेत. पक्षाने अशा समर्पित कार्यकर्त्याचा सन्मान राखायला हवा होता, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.