भंडारा : नागपूरहून भंडाराकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवर बसलेल्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१) रात्री १.३० वाजता नागपूर जिल्ह्यातील गुमथळा येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
मृतांमध्ये सिमोल भुरे (१९), आदित्य भुरे (१९) आणि किरण रामकृष्ण केवट (१८) हे टाकळी पुनर्वसन गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर मौदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने जखमी तिघांनाही नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिघांनाही तपासून मृत घोषित केले.
हे तिघे तरुण कपडे खरेदी करण्यासाठी नागपूरला गेले होते. कुटुंबातील सदस्यांनाही याची माहिती नव्हती. या घटनेबाबत मौदा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास मौदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद जगणे करत आहेत. या घटनेमुळे भंडारा शहरातील टाकळी पुनर्वसन परिसरात शोककळा पसरली आहे.