

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर साकोलीजवळील ऊकारा फाट्याजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास एका विचित्र अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही रोजगाराच्या शोधात नागपूरकडे निघाले होते. मृतांमध्ये आमगाव तालुक्यातील यादवराव गोपालराव वघारे (वय ३६, रा. आमगाव) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८, रा. मोहनटोला, ता. आमगाव) यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, वघारे आणि उपराडे हे मोटरसायकल क्रमांक MH-35-AM-0670 ने नागपूरकडे जात होते. यावेळी ऊकारा फाट्याजवळ टाटा मॅजिक क्रमांक MH-35-K-1543 या वाहनाच्या चालकाने प्रवाशांना उतरवून महामार्गावर अचानक वाहन वळविले असता याच दरम्यान मागून येणाऱ्या दुचाकीने टाटा मॅजिकला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. त्याच वेळी मागून भरधाव आलेली डस्टर कार क्रमांक MH-04-GJ-4318, चालक अशोक भैय्यालाल काळसर्पे (रा. कवळी टोला, ता. गोरेगाव) याने दोघांना चिरडले. यात यादवराव वघारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर जितेंद्र उपराडे हा कारखाली अडकून काही अंतर फरफटत गेला. त्याला गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनास्थळी लगेचच पोलीस यंत्रणा दाखल झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, वाहतूक शाखा निरीक्षक जितेंद्र बोरकर, आणि साकोली ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.
या अपघातप्रकरणी फिर्यादी अशोक भैय्यालाल काळसर्पे यांच्या तक्रारीवरून टाटा मॅजिक वाहनाचा चालक अज्ञात असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वुडुले, संदीप भगत आणि महेश नेताम करीत आहेत.