Two Killed In Road Accident Bhandara
भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वरील ठाणा पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (२२ मे) रात्री भीषण अपघात घडला. नागपूरहून रायपूरकडे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा पुढील टायर फुटल्याने चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक CG-07/CA-3400 हा माल घेऊन नागपूरहून रायपूरकडे जात असताना त्याचा उजव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे चालक रंजीत दामोदर येरणे (वय ३१, रा. केसोरी, ता. कामठी, जि. नागपूर) यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून टायर बदलण्याचे काम सुरू केले. त्यांच्यासोबत त्यांचा भाचा वेदांत प्रवीण धांडे (वय १७, रा. मानकापूर, नागपूर) तसेच दुसऱ्या ट्रकचा चालक सुनील गौर (वय ३५, रा. मानकापूर) मदत करत होते.
दरम्यान, ट्रक क्रमांक OD-02/AH-3325 चा चालक रामप्रसाद गोपाल जाट (वय ४०, रा. उमेदपूर, ता. मंडल, जि. भिलवाडा, राजस्थान) याने निष्काळजीपणे वाहन चालवत उभ्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात रंजीत येरणे आणि सुनील गौर यांचा जागीच मृत्यू झाला, तर वेदांत धांडे गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चुटे करीत आहेत.