

भंडारा : साकोली तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २१) दुपारच्या सुमारास घडली. वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन तरुण विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पळसपाणी ते चांदोरी दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याशेजारील झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे साकोली परिसरासह विद्यार्थ्यांच्या मूळ गावांवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे हे दोन्ही विद्यार्थी शैक्षणिक कामाच्या निमित्ताने पालोरा येथे गेले होते. पालोरा येथील आपली भेट (व्हिजिट) आटोपून दुचाकीने परत येत असताना पळसपाणी आणि चांदोरी गावाच्या दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली.
या भीषण अपघातामध्ये कुणाल गोटफोडे (रा. सौंदड) या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळावरच जागीच मृत्यू झाला. तर दुसरा विद्यार्थी महेश कामशेलवार (रा. चिकना/बारवा ता. लाखांदूर) हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचीही प्राणज्योत मालवली.
हे दोन्ही विद्यार्थी उमदे आणि हुशार होते. कॉलेजच्या कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्यावर अशा प्रकारे काळाने झडप घातल्यामुळे वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी आणि त्यांचे वर्गमित्र यांच्यात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.