भंडारा: रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही घटना १७ मे रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील पालोरा ते खडकी मार्गावर घडली.
आशिष सुखराम वालदे (२८) रा. पालोरा असे मृतकाचे नाव असून गणेश साठवणे (४५) रा. खडकी असे जखमीचे नाव आहे. गणेश साठवणे आणि आशिष वालदे हे दोघे दुचाकी क्र . एमएच ४० एएल १६६६ ने पालोरा येथील आठवडी बाजार करुन खडकी येथे परत जात होते. दरम्यान, पालोरा ते खडकी मार्गावरील हुडकी तलावाजवळ मागेहून रेतीची वाहतूक करणार्या अज्ञात टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आशिष वालदे याचा मृत्यू झाला. तर गणेश साठवणे जखमी झाला. अपघातानंतर टिप्परचालक पसार झाला.
या घटनेनंतर रेती तस्करीविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. अवैश रेती तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केली असली तरी रेती तस्कर त्यातूनही मार्ग काढत असल्याचे या घटनेवरुन दिसून येते. याप्रकरणी करडी पोलिस ठाण्यात टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक डोंगरे करीत आहेत.