

भंडारा: अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती चोरी व राज्य शासनाचा महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे बुडत असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर राज्याच्या महसूलमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी कार्यान्वित केलेले चेकपोस्ट कुलुपबंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय रेती डेपोची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक दाखल झाले आहे. या प्रकरणात आता कुणावर कारवाई होते? याकडे लक्ष लागून आहे.
तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी एका पत्राद्वारे रेतीतस्करीत कोतवालपासून राज्याच्या मंत्र्यांपर्यंत तस्करांचे कसे लागेबांधे आहेत, असे पत्र लिहिले होते. हा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी विधीमंडळात उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उत्तरात तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय रेती डेपोची चौकशी विभागीय आयुक्त नागपूर कार्यालयामार्फत करण्याची घोषणा केली.
या घोषणेनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक तुमसर व मोहाडी तालुक्यात दाखल झाले आहे. त्यांनी दोन्ही तालुक्यातील संपूर्ण शासकीय रेती डेपोची माहिती घेतली. दिवसभर ही चौकशी सुरू होती. यामुळे महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची मोका चौकशी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे अधिकारी विभागीय आयुक्त नागपूर यांना अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त सदर अहवाल हा राज्याच्या आयुक्तांना सादर करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या अहवालावरच या अधिकाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती उपलब्ध असून तिला शहरात मोठी मागणी आहे. येथील रेती चोरीमुळे राज्य शासनाच्या महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याने महसूल विभागाने येथे कडक कारवाई करण्याचे ठरविले असल्याची माहिती आहे. यामुळे शासन व प्रशासनाची बदनामी होते. ही बाब महसूल प्रशासनाने गंभीरतेने घेतली आहे. या प्रकरणात आता येथे कुणाची विकेट जाते. हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.