प्रातिनिधीक छायाचित्र 
भंडारा

Bhandara Accident | रानडुकरांच्या कळपावर मोटारसायकली आदळल्या; चार जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

बाम्पेवाडा राज्य मार्गावरील घटना; अचानक रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकरांमुळे अपघात

पुढारी वृत्तसेवा

भंडारा - साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा राज्य मार्गावर शनिवारी  सकाळी घडलेल्या अपघातात रानडुकरांच्या कळपाला धडक दिल्याने चार जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास बाम्पेवाडा येथून साकोलीकडे दोन वेगवेगळ्या मोटारसायकलने प्रवास करणाऱ्या स्वारांसमोर अचानक रानडुकरांचा कळप आल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राप्त माहितीनुसार, मनोज जांभुळकर (५५), भजनदास बांबोर्डे (६५), अमरदीप वलथरे (३१) व दीपक वलथरे (२८) हे चौघेही बाम्पेवाडा येथील रहिवासी असून साकोलीकडे निघाले होते. गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर अचानक रानडुकरांचा कळप रस्ता ओलांडताना समोर आला. वेगात असलेल्या दोन्ही मोटारसायकली थेट त्या कळपावर आदळल्याने चारही जण रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.

जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, साकोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील तिघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तर एका जखमीला किरकोळ दुखापत असल्याने प्राथमिक उपचारांनंतर सुट्टी देण्यात आली. जखमींनी सांगितले की, अपघात पूर्णपणे अचानक रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकरांमुळे झाला असून बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही.

दरम्यान, घटनास्थळी एमएच-४०-एम-८५५३ क्रमांकाची मोटारसायकल आढळून आली असून दुसऱ्या मोटारसायकलीचा तपास सुरू आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, अपघातामागे स्टंटबाजीचाही संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत अधिक चौकशी केली जात आहे. हा संपूर्ण परिसर वन्यप्राण्यांनी वेढलेला असून यापूर्वी वाघाच्या दहशतीनंतर आता रानडुकरांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT