भंडारा : ऋषिपंचमीनिमित्त नर्मदा स्नानासाठी गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला मध्य प्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यात भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन सुमारे १० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत २४ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात १६ सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजता सौंसर तालुक्यातील तीनखेडा गावाजवळ घडला.
भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील सावरी येथील सुमारे २५ महिला भाविक १४ सप्टेंबर रोजी तीन खासगी वाहनांनी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथील बांद्राभान संगमावर ऋषिपंचमीच्या पवित्र स्नानासाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात १५ सप्टेंबरच्या सायंकाळी भाविक जामसावळी येथील जागृत हनुमान देवस्थानाचे दर्शन आणि पहाटेची आरती घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पांढुर्णा जिल्ह्यातील सौंसर तालुक्यातील लोधीखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तीनखेडा गावाजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे झायलो वाहन (क्रमांक: एमएच ३६ एच ६७०३) थेट रस्त्यालगतच्या १० फूट खोल दरीत कोसळले.
या भीषण अपघातात सावरी येथील रहिवासी असलेला चालक आदित्य सुनील मांढरे (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला. वाहनातून प्रवास करणाऱ्या सात महिला भाविकांपैकी रेणा रमेश चौधरी (वय ६७), शीला वसंत तितीरमारे (वय ५२), रेखा वासुदेव झंझाड (वय ५०), छाया प्रभू उरकुडे (वय ५३) आणि मंगला सहदेव ठवकर (वय ६२, सर्व रा. सावरी) या पाच जणी गंभीर जखमी झाल्या. तर रिता सुभाष ठवकर (वय ५१, रा. सावरी) आणि नलू धनराज चौधरी (वय ६०, रा. भंडारा) या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या महिलांवर सध्या सौंसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. मृत आदित्य मांढरे याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच सावरी गावचे सरपंच गिरीश ठवकर यांनी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. पडोळे यांनी तातडीने भंडारा जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या वैद्यकीय व प्रशासकीय मदतीच्या सूचना दिल्या. या अपघाताची नोंद लोधीखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिकारी रामभरोसे शाहू व धुर्वे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.