भंडारा

भंडारा: दारु पिऊन झोपल्याने निलज चेकपोस्टवरील २ कर्मचारी निलंबित

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निलज येथे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेले कर्मचारी चक्क दारु पिऊन झोपले होते. त्याचवेळी निवडणूक निरीक्षकांनी चेकपोस्टची पाहणी केली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पवनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल.जे. कुंभारे आणि भंडारा पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ लिपीक सचिन पढाळ अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. वाहनांची तपासणी केली जात आहे. संशयितांवर नजर ठेवली जात आहे. निलज चेकपोस्टवर स्थिर सर्व्हेक्षण पथकामध्ये कुंभारे आणि पढाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. ५ एप्रिल रोजी निवडणूक निरीक्षक (खर्च) आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निलज चेकपोस्टला भेट दिली. त्यावेळी पवनीचे तहसीलदार, पवनीचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

परंतु, संबंधित कर्मचारी दिसून न आल्यामुळे तिथे उभारण्यात आलेल्या पेंडॉलमध्ये प्रवेश केला असता दोन्ही कर्मचारी झोपलेले दिसून आले. त्यांना उठवून निवडणूक निरीक्षकांसमोर हजर केले असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते दारु पिऊन झोपल्याचे लक्षात येताच पोलिस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले. वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार त्यांनी दारु प्राशन केल्याचे सिद्ध झाले.

निवडणूक कर्तव्यावर असताना दारु पिऊन झोपा काढण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे चेकपोस्टवर नियुक्त असलेल्या कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT