Lok Sabha Election 2024 : भंडारा-गोंदिया, गडचिरोलीवरून राष्ट्रवादी नाराज; हक्काचे मतदारसंघ सोडावे लागले | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भंडारा-गोंदिया, गडचिरोलीवरून राष्ट्रवादी नाराज; हक्काचे मतदारसंघ सोडावे लागले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा अपेक्षित आकडा गाठता न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याचे समजते. तसेच भंडारा – गोंदिया आणि गडचिरोली हे हक्काचे दोन मतदार संघ भाजपाने न सोडल्यामुळे या नाराजीमध्ये आणखी भर पडली आहे. ( Lok Sabha Election 2024 )

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विदर्भ वगळता पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा विभागात एकूण 10 ते 12 जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेप्रमाणे आपल्यालाही किमान पूर्वीचे मतदार संघ भाजपाकडून हमखास सोडले जातील, अशी खात्री होती. पण शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचाही भ्रमनिरास झाला आहे. 12 ची अपेक्षा असलेल्या या पक्षाला केवळ 6 जागा मिळतील, असे चित्र आहे. यामध्ये इतर राज्यातील एका जागेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (बारामती), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (रायगड ) आणि महादेव जानकर (परभणी ) हे तीन उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, महायुतीमधील मित्र पक्षाच्या नावाखाली भाजपाने त्यांचे जुने सहकारी महादेव जानकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. मनाविरुद्धचा उमेदवार दिल्यामुळे मागील लोकसभा निवडणूक लढविलेले राजेश विटेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे.

प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. राज्यसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले असले तरी, त्यांनी भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. परंतु, त्यांना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रामधून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आता गडचिरोली लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची अपेक्षा आहे. ( Lok Sabha Election 2024 )

पण येथेही परभणीसारखा पॅटर्न राबविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ निवडणूक चिन्हावर मैदानात उतरले आहेत, त्यानुसार आत्राम यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. मात्र आत्राम यांच्यासह राष्ट्रवादीला हे मान्य नाही. भाजपाकडून सुरु असलेले प्रयत्न पाहून मागील आठवड्यात आत्राम ‘नॉट रिचेबल’ होते असे समजते.

Back to top button