भंडारा: गायक अंजली भारती यांनी भंडारा तालुक्यातील फुलमोगरा (अशोकनगर) येथील एका कार्यक्रमात बलात्काराच्या घटनांवर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. अखेरीस पोलिसांनी अंजली भारती यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदविला आहे.
१४ जानेवारी रोजी भंडारा तालुक्यातील अशोकनगर फुलमोगरा येथे मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तार वर्धापण दिनानिमीत्त संदेश ज्ञानेश्वर वासनिक व इतरांनी प्रबोधनात्मक भीम गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना अंजली भारती यांनी राज्यातील बलात्काराच्या घटनांबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला.
बलात्काराच्या घटनांवर बोलताना अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरली. भारती यांच्या वक्तव्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अंजली भारती रा. नागपूर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक संदेश वासनिक व इतकारांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.