Samruddhi Expressway Pickup Accident  Pudhari
भंडारा

Samruddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर धावत्या पिकअपचे चाक निखळले; १७ मजूर जखमी, ९ जण गंभीर

पिकअपचे चाक निखळल्याने अपघात; ९ मजुरांची प्रकृती गंभीर, ८ जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Lakhandur Laborers Injured in Pickup Accident

भंडारा: रोजगारासाठी बुलढाण्याच्या दिशेने निघालेल्या लाखांदूर तालुक्यातील मजुरांच्या पिकअप वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. धावत्या वाहनाचे पुढील डाव्या बाजूचे चाक अचानक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन महामार्गावर उलटले. या अपघातात ९ मजूर गंभीर, तर ८ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. ३) पहाटे ५ वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मजुरांना घेऊन महिंद्रा पिकअप वाहन (क्रमांक एमएच ३७ टी ४१८३) भंडारा येथून बुलढाण्याच्या दिशेने जात होते. सोयाबीन, कापूस वेचणीच्या कामासाठी हे मजूर निघाले होते. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरच्या चॅनेल क्रमांक १२७+२०० जवळ वाहन पोहोचले असता अचानक पुढील डाव्या बाजूचे चाक निखळले. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटले. वाहनातील मजुरांना गंभीर दुखापती झाल्या. अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिस पथकाने जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रवाना करण्याची व्यवस्था केली.

जखमींवर धामणगाव रेल्वे येथे उपचार

या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये मोहन शीरभाऊ, उषा शिवरकर, रीना रामटेके, कमोद भावे, बंडू उरकुडे, योगेश उरकुडे, संजय सोंदरकर, शांता सोनवणे आणि वंदना बुराडे यांचा समावेश आहे.  किरकोळ जखमींमध्ये रोहित सहारे, अमर सहारे, स्वभा वाघमारे, विनोद रामटेके, अजय राऊत, अशोक कुंबले, महेंद्र शिवरकर आणि ललिता राऊत यांचा समावेश आहे.

सर्व १७ जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कापूस वेचणीच्या हंगामात लाखांदूर तालुक्यातील अनेक मजूर रोजगारासाठी बाहेरगावी जातात. रोजगाराच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाला झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच मजुरांचे नातेवाईक धामणगावकडे रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT