विदर्भ

भंडारा : वळणमार्गामुळे मिळणार दिलासा : नितीन गडकरी

अमृता चौगुले

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. त्यामुळे वळणमार्गाची मागणी वारंवार केली जात होती. भंडारा येथे आज बहुप्रतिक्षित असलेल्या बायपास मार्गाचे डिजीटल भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारानजिकच्या कारधा चौक येथे करण्यात झाले. या वळणमार्गामुळे नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय  वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नितिन गडकरी म्हणाले, मुंबई-कोलकता या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. आज शुभारंभ होत असलेल्या सहापदरी बायपास मार्गामुळे रायपूर, बिलासपूरकडे जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. आंभोरा येथे होत असलेला पूल भारतातील स्टेट ऑफ आर्ट केबल स्ट्रिट ब्रिज बनणार आहे. याठिकाणी पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, साकोली आणि लाखनी येथील उड्डाणपुलाचे काम झाले आहे. भंडारा ते तुमसर या अडचणीच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे. भंडारा ते बालाघाट हा संपूर्ण रस्ता क्रॉंकेटीकरण होणार आहे. त्यामुळे भंडा-याच्या सभोवताली नक्कीच चांगल्या सुविधा होणार आहेत. तसेच, लवकरच गोंदिया ते नागपूर मेट्रो सुरू होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. मेट्रो सुरू झाल्यास भंडारा ते नागपूर हे अंतर अर्ध्या तासात कापले जाणार आहे, असेही ते म्‍हणाले.

काळे झेंडे दाखवा पण योग्य ठिकाणी

भंडारा ते पवनी या महामार्गाचे काम तीन वर्षांपासून खोळंबले आहे. याचा निषेध म्हणून आज ना. गडकरी यांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. तसेच, यावर ना. गडकरींनी आपल्या शैलीतून उत्तर दिले. हा रस्ता वन विभागाने डिनोटीफाय केला आहे. परंतु, हा रस्ता वन विभागाच्या अधिका-यांनी अडवून ठेवला आहे. वन विभागाच्या अशा अधिका-यांमुळे रस्त्याचे काम खोळंबले आहे. अशा अधिका-यांना जिल्ह्यात राहू देऊ नका, त्यांच्यापुढे निदर्शने करा. महाराष्ट्राचे वनमंत्री हे मुख्यमंत्री आहेत आणि राज्य कॉंग्रेसचे आहे. या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे काळे झेंडे दाखविले तर चांगले होईल, असा टोला नितिन गडकरीनी यावेळी लगावला.

यावेळी मंचावर खा. सुनील मेंढे, आ. डॉ. परिणय फुके, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गि-हेपुंजे, माजी आमदार बाळा काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT