भंडारा, पुढारी वृत्तसेवा : घरकुलाबाबत ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाची प्रत देण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.२२) मोहाडी तालुक्यातील नवेगाव बुज येथे ही कारवाई केली. धनंजय रामचंद्र लांजेवार (वय ३५) असे ग्रामसेवकाचे तर लालचंद गोपीचंद चकोले (४९) असे शिपायाचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने घरकुल मंजूर झालेले होते. तक्रारदार यांचे वडील मरण पावल्याने सदरचे घरकुल आईच्या नावाने ग्रामपंचायतच्या ठरावावरून हस्तांतरीत झाले. त्यानंतर तक्रारदार यांच्या आईचेही निधन झाल्याने सदर घरकुल तक्रारदार यांचे नावाने हस्तांतरीत करण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव पाहिजे असल्याने ठरावाकरीता लागणारे सर्व कागदपत्रे तयार करून तक्रारदार यांनी ग्रामसेवक धनंजय रामचंद्र लांजेवार (३५) यांच्याकडे जमा केले.
ग्रामपंचायतने घेतलेल्या ठरावाची प्रत देण्याकरिता यातील ग्रामसेवक धनंजय रामचंद्र लांजेवार यांनी ग्रामपंचायत शिपाई लालचंद गोपीचंद चकोले (४९) याच्यामार्फत ७ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारादार यांची लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली़. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने सापळा रचण्यात आला़
२२ मे रोजी ग्रामसेवक धनंजय लांजेवार याने शिपाई लालचंद गोपीचंद चकोले याच्यामार्फत लाचेची मागणी केली. सापळा कारवाईत लालचंद चकोले याने पंचासमक्ष ७ हजार रुपये लाच रक्कम स्विकारली. दोघांवरही मोहाडी तालुक्यातील करडी पोलिस स्टेशन येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते, पोलिस उपअधीक्षक, डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमित डहारे, पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, अंकुश गाढवे, पोलिस नायक अतुल मेश्राम, शिलपेंद्र मेश्राम, पोलिस अंमलदार चेतन पोटे, विवेक रणदिवे, मयूर शिंगणजुडे, चालक राहुल राऊत यांनी केली़.