Amravati youth stabbing case
अमरावती : राजापेठ पोलिस स्टेशन अंतर्गत ज्योती कॉलनीत एका तरूणाची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.६) रात्री ११ च्या दरम्यान समोर आली. प्राथमिक माहितीनुसार काही जणांनी तरूणाला घेरले आणि त्याची हत्या केली, त्याच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. देवांशू अनिल फरकाळे (वय २२, रा. गोपाल नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या गोपाल नगर-ज्योती कॉलनीमध्ये मंगळवारी संध्याकाळी देवांशू फरकाडे हा लाइटिंग चे काम करत होता. त्यानंतर ही घटना झाली. जुन्या वादातून हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही लोकांनी आरोपीला बघितल्याचे देखील समजते. ज्योती कॉलनीतील रहिवासी पुरुषोत्तम सुरेश काळे आणि देवांशू फरकाळे हे लाईटिंगचे काम करत होते.
दरम्यान, देवांशूने आरोपींना पाहिल्याबरोबर तो पुरुषोत्तम काळेच्या घरात गेला. काही वेळाने देवांशू बाहेर येताच आरोपींच्या जमावाने त्याला घेरले. त्याच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसही इर्विन रुग्णालयात पोहोचले होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.