Amravati Gulistannagar youth murder
अमरावती : शहरात सर्वत्र दीपावली साजरी होत असताना गुलिस्ता नगर परिसरात अलबदर हॉलसमोर क्षुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रात्री समोर आली आहे. मृताचे नाव अब्दुल सोहेल अब्दुल शाकीब (वय २०, गुलिस्ता नगर ) व आरोपीचे नाव मो.मुस्तकीम मो.मुमताज (वय २०, पॅराडाईज कॉलनी ) असे आहे.
माहितीनुसार मंगळवारच्या रात्री आरोपी मो. मुस्तकीम पॅराडाईज कॉलनी येथून गुलिस्ता नगरमध्ये फिरायला गेला होता. त्याचवेळी अब्दुल सोहेल याने एक फटाका रस्त्यावर फेकला. जळता फटाका अंगावर फेकल्याचे कारणावरून मो. मुस्तकीम ने अब्दुल सोहेलला शिवीगाळ केली. यानंतर तो तिथून चालत गेला आणि त्याने रात्री अब्दुल सोहेल याला चर्चा करण्यासाठी अल बदर हॉल समोर बोलावले. जिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद एवढा वाढला की दोघांमध्ये मारहाण झाली.
यादरम्यान, आरोपी मो. मुस्तकीम पठाण ने अ. सोहेलच्या मानेवर आणि खांद्यावर चाकूने वार केले. तसेच अब्दुल सोहेलने पण आरोपीवर हल्ला केला. यामध्ये आरोपी सुद्धा जखमी झाला. जखमी अवस्थेत अ.सोहेलला आधी बेस्ट हॉस्पिटल आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीवर देखील उपचार सुरू आहे. पोलिसांनी अब्दुल सोहेलच्या मृत्यूनंतर मो. मुस्तकीम विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि.२२) फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे एकत्रित केले. नागपुरी गेट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.